ऑनलाइन लोकमत -
कानपूर, दि. 21 - रमजानमध्ये उपवास असल्याने मुस्लिमांना सकाळी लवकर उठावं लागतं. रमजानमध्ये दिवसभर पाणीही न पिता रोजे केले जातात. दिवस उगवण्याच्या आधी म्हणजे पहाटे पाचच्या आधीच नाष्टा, जेवण केले जाते. त्यामुळे साहजिकच पहाटे लवकर उठावे लागते. अनेकदा ही जबाबदारी घरातील महिलेवर असते. पण उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव नामक इसमाने ही जबाबदारी स्वीकारली असून ते त्यांच्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात.
उत्तरप्रदेशातील मुबारकपूर बनारसी साडी कामगारांसाठी प्रसिद्द आहे. पहाटेचे 1 वाजले आहेत, आणि गावात फक्त दोनच व्यक्ती जाग्या आहेत. रमजानमध्ये गुलाब यादव यांचा दिवस मध्यरात्री एकपासूनच सुरू होतो आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकही जागा असतो. ना त्यांचा उपवास असतो, ना ते धर्माने मुस्लिम..! पण तरीही मुस्लिम बांधवांना पहाटे वेळेत उठता यावं या जबाबदारीच्या जाणीवेमुळे यादव व त्यांचा मुलगा जागे राहून घरोघरी जाऊन सर्वांना लवकर उठवतात.
गुलाब यादव आणि अभिषेक 1 ते 3 वाजेपर्यंत सर्वांना उठवण्याचं काम करत असतात. विशेष म्हणजे एका घरातील सर्व व्यक्ती जोपर्यत उठत नाही तोपर्यंत ते दुस-या घराकडे वळत नाहीत. गुलाब यादव यांच्या कुटुंबात 1975 पासून ही परंपरा सुरु आहे.
मात्र हे का आणि कसं सुरु झालं ? हे गुलाब यादव यांना आठवतही नाही. 'यामुळे मनाला शांतता मिळत असावी. माझ्या वडिलांनी हे सुरु केलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने काही वर्ष ही परंपरा सुरु ठेवली आणि त्यानंतर मी आता हे काम कायम ठेवलं आहे. प्रत्येक रमजानला मी येथे येतो आणि सर्वांना उठवतो', असं गुलाब यादव सांगतात.
गुलाब यादव रोजंदारीवर काम करतात. ते दिल्लीमध्ये असतात मात्र रमजानच्या महिन्यात ते गावी येतात. 'मी चार वर्षांचा होतो तेव्हा यादव कुटुंबाने ही परंपरा सुरु केली', असं त्यांचा शेजारी शफीक सांगतो. 'हे खुपच कौतुकास्पद आहे. ते संपुर्ण गावाला फेरी मारतात. त्यासाठी त्यांना सुमारे दीड तास लागतो. मात्र एक फेरी पूर्ण झाल्यावर ते दुसरी फेरीदेखील मारतात. कोणीही सेहरी केल्याशिवाय घराबाहेर पडू नये याची ते खात्री घेतात. याशिवाय दुसरं पुण्य काय', असंही शफीक यांनी म्हटलं आहे.