बिकानेर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर येथील ट्रान्सपोर्टनगर भागात मंगळवारी काळी शाई फेकण्यात आली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध कोटगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाईफेक करणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. केजरीवाल यांनी भारतीय लष्कराच्या पाकव्याप्त काश्मिरातील सर्जिकल कारवाईचे पुरावे मागितले होते. त्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांच्यावर काळी शाई फेकली. शाई मुख्यमंत्र्यांच्या कपड्यावर पडली. पोलिसांनी या प्रकरणी अभाविपचे कार्यकर्ते दिनेश ओझा आणि विक्रमसिंह यांना अटक केली आहे. बिकानेर येथील आपचे कार्यकर्ते हिरालाल सेवता यांचे सांत्वन करण्यासाठी केजरीवाल येथे आले होते. सेवता यांच्या पत्नीचे अलीकडेच निधन झाले आहे. शाईफेकवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी हल्लेखोरांना शुभेच्छा दिल्या. केजरीवाल जोधपूर येथून बिकानेरला जात असताना मंगळवारी अभाविपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले होते. सर्जिकल हल्ल्याचे पुरावे मागितल्यावरून चोहीकडून हल्ले सुरू झाल्यानंतर केजरीवाल यांनी सोमवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कारवाईबद्दल कौतुक केले होते. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय माध्यमे भारताने सर्जिकल कारवाई केली नसल्याचा दुष्प्रचार करीत आहेत. त्यांना उघडे पाडण्यासाठी पुरावे उघड करावेत, असा सूर केजरीवाल यांनी आता लावला आहे. (वृत्तसंस्था)
केजरीवाल यांच्यावर राजस्थानात शाईफेक
By admin | Published: October 06, 2016 5:26 AM