नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणी मोठा दिलासा देत, कनिष्ठ न्यायालयातील या प्रकरणांच्या सुनावणीला स्थगिती दिली. यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकार, अमित सिब्बल आणि पवन खेडा यांना नोटीसही जारी केली. न्यायालयाने यासंदर्भात भारतीय दंड विधानाच्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांसोबत या प्रकरणांचीही सुनावणी होईल, असे सांगत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैला निश्चित केली.सुनावणीस स्थगिती मिळालेले पहिले प्रकरण माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांचे चिरंजीव अमित सिब्बल यांनी दाखल केले होते. यात केजरीवाल यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, शाजिया इल्मी आणि प्रशांत भूषण यांना आरोपी बनण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी पटियाला हाऊस न्यायालयात सुरू आहे. दुसरे प्रकरण दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सचिव पवन खेडा यांनी दाखल केले आहे. (वृत्तसंस्था)
केजरीवाल यांना कोर्टाचा दिलासा मानहानी प्रकरणाला स्थगिती
By admin | Published: May 01, 2015 10:47 PM