नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात संसदीय सचिव पदांवरून परस्पर भिडणारे भाजपा आणि आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात आता एनडीएमसीचे अधिकारी एम.एम. खान यांच्या हत्येवरून जुंपली आहे.केजरीवाल यांनी खान यांच्या हत्याप्रकरणी पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार महेश गिरी यांच्या अटकेची मागणी करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा बचाव करीत असल्याचा आरोप केला आहे, तर केजरीवाल यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध करावे, अन्यथा मुख्यमंत्री पद सोडावे, या मागणीसाठी खा. गिरी यांनी मुख्यमंत्री निवासस्थानासमक्ष रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही सोमवारी या वादात उडी घेतली असून, हत्येचा आरोप करणाऱ्या केजरीवालांनी गिरी यांची क्षमा मागावी अन्यथा दिल्लीचे सरकार बडतर्फ करण्यात यावे, असा सूर लावला. (लोकमत न्यूज नेटवर्क)सुब्रमण्यम स्वामी यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर हल्लाबोल करीत ते सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या म्हणण्यानुसार काम करत असल्याचा आरोप केला. प्रकरण काय : एनडीएमसीचे मालमत्ता अधिकारी खान यांची १६ मे रोजी जामियानगर भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ते स्थानिक संस्थेद्वारे लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवरील हॉटेलच्या लीजसंबंधी अटींवर अंतिम आदेश काढणार होते.
केजरीवाल आणि भाजपा नेत्यांत जुंपली
By admin | Published: June 21, 2016 7:30 AM