नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे. काँग्रेस नेते अवतार सिंह भडाना यांनी पतियाळा हाऊस कोर्टात केजरीवालांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून 1 कोटींची नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर केजरीवाल यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. एका सहका-याच्या नादाला लागून ही भडाना यांच्यावर आरोप केल्याचं केजरीवालांनी सांगितलं आहे.केजरीवाल यांनी 31 जानेवारी 2014ला वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भडाना यांनी आरोप केला आहे. भडाना देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींमधील एक आहेत. मात्र भडाना यांनी प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भडाना यांनी केजरीवालांच्या त्या विधानाविरोधात न्यायालयात दाद मागितली. केजरीवालांच्या विधानामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचं भडाना म्हणाले आहेत. भडाना यांनी केजरीवालांना कायदेशीर नोटीस पाठवून विधान मागे घेण्यासोबतच बिनशर्त माफीचीही मागणी केली होती. त्यानंतर केजरीवालांनी विधान मागे घेण्यासोबतच भडाना यांची माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पटियाळा हाऊस कोर्टात भडाना यांना लेखी स्वरूपात केजरीवालांना माफीनामा दिला आहे. सहका-याच्या नादाला लागून मी आरोप लावल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. चौकशीतून त्या आरोपांची शहानिशा झाली नाही. त्यामुळेच मी माफी मागितल्याचं केजरीवाल म्हणाले. तसेच भडाना यांच्या आरोप करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा माझा कोणताही उद्देश नसल्याचंही ते म्हणाले आहेत. भडाना यांच्याशिवाय केजरीवालांविरोधात अनेक मानहानीची प्रकरणं दाखल आहेत.अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याचीही कोर्टात केस सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले होते. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत.
मानहानी प्रकरणात केजरीवालांनी काँग्रेस नेत्याची लेखी स्वरूपात मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 5:12 PM