नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अमरिंदर सिंग यांनी आज केजरीवाल यांच्यावर खरमरीत टीका करताना केजरीवाल हे विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल हे असे व्यक्ती आहेत. ज्यांना कुठल्याही माहितीशिवाय काहीही बोलण्याची सवय आहे.दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र दोघांनीही केजरीवाल यांना भेटण्यास नकार दिला.केजरीवाल यांच्यावर टीका करताना अमरिंदर सिंग म्हणाले,"केजरीवाल विचित्र व्यक्ती आहेत. जे कुठल्याही मुद्द्यावर विचार न करता बोलायला सुरुवात करतात. आमच्याकडे सुमारे दोन अब्ज टन पिकांचा कडबा आहे. आता मी काय शेतकऱ्यांना तो साठवून ठेवायला सांगू का? केजरीवाल यांना या समस्येची पुरेशी माहिती नाही आहे."असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला आहे. दिल्लीला धुरक्यापासून वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतातील पाचट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर तिन्ही राज्यांनी मिळून उपाय शोधला पाहिजे, असे सूचवले होते. त्याला उत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या कामात राज्याची नव्हे तर केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तर खट्टर यांनी हरयाणा सरकार आपल्या पातळीवर योग्य ती कारवाई करत असल्याचे उत्तर दिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सूरपाल खैरा हे शेतात पिक जाळताना दिसत आहेत. दरम्यान, सुरपाल खैरा यांनी आपण येथील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शेतातील पिक जाळत असल्याचे म्हटले आहे. खैरा यांनी 15 ऑक्टोबरला लुधियानामधील समराला येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांनी शेतातील पाचट जाळल्यामुळे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात आपल्या शेतातील पीक जाळून निषेध नोंदवला होता.