ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - केजरीवालांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यथित झाले आहेत. सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी दिले आणि हे मी स्वतः पाहिलं, अशा मिश्रांच्या आरोपांनंतर अण्णा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अण्णा म्हणाले, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल नेहमीच पुढे असायचे, एकेकाळी केजरीवालांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. मात्र आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं खूप दुःख होतंय.केजरीवाल सरकारनं माझं स्वप्न आधीच भंग केलं आहे. या प्रकरणावर पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स नाऊला अण्णा म्हणाले, मी पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेन आणि मगच त्यावर विस्तारानं चर्चा करेन, आता मी जे टीव्हीवर पाहतो आहे. त्या बातम्या पाहून मला खूप दुःख होतंय, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढतो आहोत. मी गेल्या 40 वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे. दिल्लीत जी भ्रष्टाचार विरोधात लढाई झाली त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री बनले. मात्र आज त्यांच्यावरच असे आरोप लागत असल्यानं ही खूपच दुःखदायक घटना आहे. मी आता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. जेव्हा कॅबिनेटमधल्या 6 मंत्र्यांपैकी तिघांनी राजीनामा दिला, तेव्हाच माझं स्वप्न भंग झालं. कॅबिनेट मंत्री येऊन बोलतो की, मी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिले. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे. किरण बेदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, एका मुख्यमंत्र्यांविरोधत एक मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप लावतो आहे. आणि साक्षीदार होण्याचा दावा करतो आहे. याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. एकंदरीतच केजरीवालांच्या पुढच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.
केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा
By admin | Published: May 07, 2017 5:56 PM