नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना उद्याचा दिवस उपवास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
"देशातील अनेक खेळाडूंनी शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. मग ते देशद्रोही झाले का? देशातील वकील, व्यापारी देशद्रोही आहेत का? अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी काँग्रेस सरकारकडून बदनामी केली जात होती. आता भाजपकडून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे", असं केजरीवाल म्हणाले. ते डिजिटल कॉन्फ्रेन्समध्ये बोलत होते.
"माजी सैनिक इथं बसलेले आहेत. ज्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. मग तेही देशद्रोही आहेत का? भाजपच्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आणि पुरस्कार जिंकले. असे अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का?", असं केजरीवाल म्हणाले.
देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची घोडचूक कुणी करू नये, असं रोखठोक मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. काही मोजके शेतकरी या आंदोलनात असतील असं समजण्याची चूक सरकारने करू नये. देशातील प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या एक दिवसाचा उपवास ठेवावा, असंही केजरीवाल म्हणाले.