ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - अमृतसरला धार्मिक शहराचा दर्जा देण्याचे आश्वासन देणारे अरविंद केजरीवाल, हे मतांसाठी वाट्टेल ती बडबड करतात आणि त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठली आहे, अशी टीका सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केली आहे. पंजाबमधल्या निवडणुकांमध्ये विजयी झालो तर अमृतसरला धार्मिक शहर असा दर्जा देऊ अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. तसेच अमृतसरमध्ये मद्य, मांस व तंबाखू या सगळ्यांवर बंदी घालू असेही ते म्हणाले आहेत. याचा समाचार घेताना फेसबुक पोस्टमध्ये काटजू म्हणतात की,"डोक्यात असलं काहीही नसताना केवळ मतांसाठी केजरीवाल बोलत आहेत. जर असं काही केलं, तर अलाहाबाद, वाराणसी, अयोध्या, मथुरा, पुरी, द्वारका, हरीद्वार, गया, महेश्वरी, मदुराई व अजमेरसारख्या शहरांमधूनही अशाच मागण्या होतील." अशा घोषणा मतांसाठी ठीक असू शकतात परंतु देशाच्या सेक्युलर प्रतिमेशी विसंगत असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे.
राम मंदीर - बाबरी मशिदीचा दाखला देत काटजू यांनी या मुद्यावर भाजपाला सत्ता मिळाली परंतु देशाचे प्रचंड नुकसान झाले असे म्हटले आहे. यापूर्वी केजरीवाल यांना प्रामाणिक व्यक्ती हे आपण दिलेले प्रशस्तीपत्रक ही एक चूक होती असे काटजू यांनी कबूल केले आहे आणि केजरीवालांच्या घोषणा मूर्खपणाच्या असल्याची टीका केली आहे.