नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आज नायब राज्यपालांची भेट घेतली आणि दिल्लीत सरकार स्थापनेविषयी राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र मागे घेण्याची विनंती केली. दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपाला निमंत्रण देण्यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ‘आप’ प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया होते. आम्ही आपल्या स्टिंग आॅपरेशनची सीडी त्यांना दिली आहे. त्यामध्ये भाजपा आमच्या आमदाराला चार कोटी रुपयांत खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही नायब राज्यपालांना व्हिडिओ बघण्याची विनंती केली आहे. आम्ही त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ४ सप्टेंबरला पाठविलेल्या पत्रावर फेरविचार करण्याची विनंती केली, असे मनीष सिसोदिया म्हणाले. दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपा घोडेबाजार करीत असल्याचा आरोप आप नेत्याने केला. घोडेबाजार करून भाजपाने सरकार बनविले तरी दिल्लीची समस्या दूर होणार नाही. अशाप्रकारचे सरकार दिल्लीच्या नागरिकांवर ओझे बनेल आणि त्यांचा विश्वासघात होईल, असेही सिसोदिया म्हणाले. (वृत्तसंस्था)
केजरीवाल नायब राज्यपालांना भेटले
By admin | Published: September 11, 2014 1:37 AM