नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना आणि नेत्यांना संस्कृतीचे पालन करण्यास भाग पाडले आहे. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काही तरी नवीन करत असतात. विचार का करायचा, बजेट का द्यायचे, त्यापेक्षा दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे क्रेडीट घ्यायचे धोरण केजरीवाल यांचे असल्याची टीका शाह यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत, असंही शाह म्हणाले.