नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला रामराम करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू आप नेते कुमार विश्वास यांनी सर्वप्रथम केजरीवालांना बाय केला होता. त्यानंतर, आपचे प्रवक्ते आशुतोष यांनीही काही दिवसांपूर्वी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, आता आशिष खेतान यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजीच खेतान यांनी याबाबतचा मेल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता.
आम आदमी पक्षाला गळती लागल्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. तर खेतान यांच्या राजीनाम्यानंतरही विश्वास यांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे. 'हम तो चँद्र गुप्त बनाने निकले थे, हमे क्या पता था चँदा गुप्ता बन जाएगा' असे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे. आप पक्षाला मिळणाऱ्या गुप्त चंदा (निधी) वरुन विश्वास यांनी केजरीवालांना टार्गेट केले आहे. तर प्रसिद्ध वकिल आणि आपचे जुने सहकारी प्रशांत भूषण यांनीही केजरीवालांवर निशाणा साधला आहे. काही लोकांनी महान आदर्शांचा उद्देश ठेवून आम आदमी पक्षाची स्थापना केली, पण, कडवटपणामुळे त्यांच्या सूचनांना दुर्लक्ष केलं जात आहे. आपची स्थापना म्हणजे एक मोठा आशावाद होता. मात्र, एका व्यक्तीच्या बेईमान महत्वकांक्षा आणि दूरदृष्टीच्या कमतरतेमुळे सर्वकाही नष्ट झाले आहे. एखाद्या संस्थेला कशाप्रकारे नेस्तनाबूत करावे, याचे उदाहरण (केस स्टडी) म्हणजे आप असल्याचे भूषण यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, एका व्यक्तीने ट्विट करताना, शांति भूषण, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अॅडमिरल रामदास, अंजली दमानिया, मेघा पाटकर, मयंक गांधी, आनंद कुमार, कुमार विश्वास, आशुतोष, आशीष खेतान, सुखपाल खैरा, धर्मवीर गांधी हे सर्व चुकीचे आणि सत्तेचे लालची. केवळ एक आमचे युगपुरुष पार्टी संयोजक आणि मुख्यमंत्री यांनाच सत्तेचं लालच नाही, असे म्हटले आहे.