लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे आरोप फेटाळले असले, तरी या मुद्द्यावरून भाजपा व इतर पक्ष आक्रमक झाले आहेत. केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मिश्रा यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्रकारांशी बोलताना मिश्रा म्हणाले की, ‘जैन यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवाल यांना नगदी दोन कोटी रुपये देताना आपण बघितले आहे. आपण याबाबत केजरीवाल यांना विचारणा केली असता, ते म्हणाले होते की, ‘राजकारणात अशा गोष्टी होत असतात.’ जैन यांनी आपल्याला असे सांगितले होते की, त्यांनी केजरीवाल यांच्या नातेवाईकांचा ५० कोटींचा जमिनीचा एक व्यवहार केला आहे. याबाबतही आपण केजरीवाल यांना विचारणा केली असता, हे सर्व खोटे असल्याचे सांगत, आपल्यावर विश्वास ठेवा, असे ते म्हणाले.’ या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, मिश्रा यांनी केलेले आरोप उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाहीत. खराब कामगिरीमुळे त्यांना मंत्रिपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. या आरोपात काहीही तथ्य नाही.तथापि, मिश्रा यांचे असे म्हणणे आहे की, भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आपण पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणल्यानंतर आपल्याला मंत्रिपदावरुन हटविण्यात आले आहे. पक्षाला मिळणारा निधी, पंजाब निवडणूक आणि दिल्ली सरकारशी संबंधित विविध प्रकारचे भ्रष्टाचार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. मिश्रा म्हणाले की, अनेक प्रकरणे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहेत. पण, केजरीवालांवर मला विश्वास होता. की, त्यांना कोणी भ्रष्ट करु शकत नाही. मनी लाँड्रिंग, काळा पैसा, मंत्री जैन यांच्या मुलीची नियुक्ती, लक्झरी बस योजना, सीएनजी फिटनेस टेस्ट घोटाळा याबद्दलही मी जाणून होतो. याबाबत केजरीवाल कारवाई करतील असे मला वाटत होते. आपमध्ये राहूनच आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार असून कोणीही आपल्याला पक्षाबाहेर काढू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, आपण पक्षातून भ्रष्टाचार संपवू आणि त्या कामाच्या सुरुवातीसाठीच आपण राजघाटावर आलो आहोत. या सरकारमधील मी असा एकमेव मंत्री आहे ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. सत्तेच्या नशेत केजरीवाल भरकटले - अण्णा हजारे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे सत्तेच्या नशेत भरकटलेले आहेत. त्यांनी दोन कोटी रुपये घेतले असतील आणि हा प्रकार खरा असेल तर केजरीवाल यांची वाटचाल वेगळ््या विचारांच्या दिशेने चालली आहे. सातत्याने त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने खूप दु:ख झाल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात लढाई झाल्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री बनले. मात्र त्यांच्यावरील आरोपांमुळे दु:ख होत आहे. मी आता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही, असे अण्णा म्हणाले.केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा!केजरीवाल यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल, तर त्यांनी पद सोडायला हवे. याबाबत आपण नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा करणार आहोत. जर केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही, तर नायब राज्यपालांनी आप सरकार बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करावी. - मनोज तिवारी, भाजपा दिल्लीचे प्रमुख आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराविरोधातील आपली ओळख हरवून बसला आहे. केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मिश्रा यांचे आरोप अतिशय गंभीर असून, सीबीआय आणि एसीबी यांनी याची दखल घ्यावी.- अजय माकन, दिल्ली काँग्रेसचे प्रमुख केजरीवाल लुटारू आहेत व फक्त स्वत:चे खिसे भरण्यातच त्यांना रस आहे, हे आमचे पूर्वीपासूनचे म्हणणे आहे. भ्रष्ट चेहरा जगापुढे आल्याने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. - कॅ. अमरेंद्र सिंग, मुख्यमंत्री, पंजाब
केजरीवालांनी २ कोटी घेतले
By admin | Published: May 08, 2017 5:19 AM