भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रीतपाल सिंग म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच तजिंदर यांना घाबरतात. कारण तजिंदर नेहमीच त्याच्या चुका उघड करत आला आहे. महत्वाचे म्हणजे, केजरीवाल यांनी तजिंदर यांना, आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील होण्यासाठी पटवण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु ते आपमध्ये सामील झाले नाहीत.
काय म्हणाले, प्रीतपाल सिंग बग्गा - केजरीवाल जोवर सत्तेत आहेत किंवा त्यांच्यात सुधारणा होत नाही, तोवर हे असेच सुरू राहणार. माझे तजिंदरसोबत बोलणे झालेले नाही, त्यांच्याकडे फोनही नाही. तसेच, पंजाब आणि हरियाणा उच्चन्यायालयाने तजिंदर यांच्यावर दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याने, आम्ही आनंदित आहोत, असे ते म्हणाले.
तजिंदर बग्गा याच्या अटकेवरून शुक्रवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चाललेल्या राजकीय नाट्यानंतरही, हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. तथापी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तजिंदर यांना तात्काळ दिलासा दिला असून त्याच्यावर 10 मेपर्यंत दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, पंजाब पोलिसांनी तजिंदर बग्गा यांना पगडी नसताना अटक केल्याप्रकरणी आणि त्याच्या वडिलांसोबत कथित मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून 7 दिवसांत अहवाल मागवला आहे.
बग्गा यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची दंडात्मक करारवाई करू नये -एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रीतपाल सिंग बग्गा म्हणाले, “पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने तेजिंदरपालसिंग बग्गा यांच्यावर दंडात्मक कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आम्ही आनंदी आहोत. तेजिंदरपालसिंग बग्गा यांच्याकडून केजरीवालांच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असल्याने ते भितात. यासाठीच त्यांनी तजिंदरपालसिंग यांना आम आदमी पक्षात घेण्यासाठी प्रयत्नही केले होते. पण तेजिंदरपाल यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.