अमृतसर : ‘आप’प्रमुख मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चुकीचे प्रायश्चित म्हणून येथील सुवर्णमंदिरात सोमवारी प्रसादाची भांडी धुतली. पक्षाने जाहीरनाम्यात पक्षचिन्ह झाडूसोबत सुवर्णमंदिराचे छायाचित्र छापल्याने शीख समुदायात रोष निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी केजरीवाल यांनी हे पाऊल उचलले. केजरीवाल रविवारी रात्री येथे आले. त्यांनी आज सुवर्णमंदिराच्या स्वयंपाकघरात ४५ मिनिटे भांडी धुतली. त्यानंतर, प्रार्थनेसाठी ते हरमिंदर साहेब येथे गेले. आम्ही जाहीरनाम्यात नकळतपणे काही चूक केली असल्यास सेवा करून माफी मागण्यासाठी मी येथे आलो आहे. मी सेवा केली, तसेच ‘शब्द कीर्तन’ श्रवण केले. त्यामुळे माझ्या मनाला शांतता लाभली आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. आपचे प्रवक्ते आशिष खेतान त्यांच्यासोबत होते. आपच्या जाहीरनाम्यात पक्षाचे चिन्ह झाडूसोबत सुवर्णमंदिराचे छायाचित्र छापल्यामुळे अमृतसर पोलिसांनी खेतान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)>पक्षासाठी केली सेवा पंजाब विधानसभेसाठी पुढच्या वर्षी निवडणुका होत असून ‘आप’ने आतापासूनच आक्रमक प्रचारमोहीम सुरू केली आहे. खेतान यांनी पक्षाच्या जाहीनाम्याची तुलना थेट गुरू ग्रंथसाहिबशी केल्यामुळे शिखांच्या धार्मिक, राजकीय संघटना भडकल्या. त्यांनी केजरीवालांच्या माफीनाम्याची मागणी केली. निवडणुकीत यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, हे लक्षात येताच केजरीवाल यांनी सुवर्णमंदिरात सेवा करण्याचे पाऊल उचलले. >हे सेवेचे नाही, धोक्याचे राजकारण - कौरदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सेवेचे नाही, तर धोक्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर यांनी सोमवारी येथे केला. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास ते असमर्थ ठरले आहेत. त्यांचे दिल्लीतील सरकार अपयशी ठरले आहे, असेही त्या म्हणाल्या.
केजरीवालांनी ४५ मिनिटे धुतली भांडी!
By admin | Published: July 19, 2016 5:48 AM