नवी दिल्ली- शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्या पक्षात मात्र गोंधळ उडाला आहे. आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मी आम आदमी पक्षाच्य़ा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र ड्रग्ज माफिया आणि पंजाबातील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मी पंजाबच्या 'आम आदमी'बरोबर कायम असेन असं ट्वीट मान यांनी केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया हे ड्रग्जच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत असा आरोप केला होता मात्र त्यानंतर त्यांनी काल माफी मागत आरोप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयावर मान यांनी नाराज होऊन प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे.त्याबरोबरच आपचे पंजाबातील दुसरे नेते सुखपाल सिंग खैरा यांनीही केजरीवाल यांच्या माफीनाफ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब सरकारने मजिठिया यांच्याविरोधात सबळ पुरावे दाखल करुनही अरविंद केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितल्यामुळे पंजाबात आम्ही सगळे (आम आदमी पभाचे नेते, कार्यकर्ते) नाराज झालो आहोत असे खैरा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अमृतसरच्या न्यायालयात सादर केलेल्या माफीपत्रात केजरीवाल यांनी मी नुकतेच ड्रग्ज व्यवसायांसदर्भात काही विधाने आणि आरोप केले होते. त्याचा आता राजकीय मुद्दा झाला आहे, ते आरोप चुकीचे असल्याचे असल्याचे माझ्या लक्षात येत आहे, त्यामुळे अशा मुद्द्यांवर राजकारण होऊ नये असं मला वाटतं. माध्यमे, राजकीय सभा, कार्यक्रम, सार्वजनिक सभांमध्ये मी आरोप केल्यामुळे आपण (मजिठिया) माझ्य़ावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे मी आपल्यावरील सर्व आरोप मागे घेत आहे. या आरोपांमुळे आपण, आपले कुटुंबीय, मित्र, हितचिंतक, समर्थक यांना झालेल्या त्रासाबद्दल मी आपली क्षमा मागत आहे असे नमूद केले होते.