चंदीगढ : आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर ते अमलीपदार्थांच्या तस्करीत गुंतले असल्याच्या केलेल्या आरोपांबद्दल माफी मागितल्यामुळे पक्षाचे संगरूरचे खासदार भगवंत मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे.अरविंद केजरीवाल यांच्या माफीनाम्यामुळे आम आदमी पक्षात खळबळ माजली असून, पक्षाच्या अनेक नेत्यांना तो निर्णय आवडलेला नाही. बऱ्याच नेत्यांनी माफीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पंजाब आपचे उपाध्यक्ष अमन अरोरा यांनीही राजीनामा दिला आहे, तर आपशी पंजाबात असलेली आघाडी तोडण्याचा निर्णय इन्साफ पार्टीने जाहीर केला आहे.केजरीवाल यांनी मागितलेल्या माफीमुळे पंजाबमधील आपच्या जवळपास सर्व नेत्यांनी आम्हाला धक्का बसला व आम्ही निराश झाल्याचे म्हटले आहे. मान यांनी टिष्ट्वटरवर जाहीर केलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, ‘आपच्या पंजाब शाखेच्या प्रमुखपदाचा मी राजीनामा देत आहे. परंतु, ड्रग माफिया आणि पंजाबमधील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील माझा संघर्ष ‘आम आदमी’ या नात्याने सुरूच राहील. माफीनाम्यामुळे पंजाबमधील आपमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत.मजिठिया हे अमलीपदार्थांच्या धंद्यात गुंतले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. गुरुवारी त्यांनी या आरोपांबद्दल पत्राद्वारे माफी मागताना माझे आरोप हे निराधार होते. आता त्यावरून काही राजकारण व्हायला नको. तुमच्याबद्दल मी केलेली सगळी विधाने आणि आरोप या पत्राद्वारे मागे घेत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.पंजाबमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखपाल सिंग खैरा म्हणाले की, केजरीवालांनी मागिलेल्या माफीने मी थक्कच झालो. केजरीवाल यांनी माफी मागायच्या आधी आमच्याशी सल्लामसलत केली नव्हती. पंजाबमधील तरुण पिढीला नष्ट करणाºया अमलीपदार्थांविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील.अमलीपदार्थाच्या विषयावर बिक्रम मजिठिया यांच्यावर खटला चालविण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचे स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) उच्च न्यायालयात गुरुवारी सांगितले असताना केजरीवाल यांनी माफीमागावी हे मला समजत नाही. (वृत्तसंस्था)>केजरीवाल यांनी धोका दिलामजिठिया यांची माफी मागून अरविंद केजरीवाल यांनी केवळ पक्षालाच नव्हे, तर पंजाबमधील जनतेलाही धोका दिला आहे. आपण घाबरट असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू यांनी केली आहे. या माफीमुळे केजरीवाल यांनी पक्षाचे पंजाबमधील अस्तित्वच संपवून टाकले आहे, असेही ते म्हणाले.>ंजेटली यांचीही माफी मागणार?केजरीवाल यांनी अरुण जेटली यांच्यावरही आरोप केले होते. जेटली यांनी त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात केला आहे. त्यामुळे जेटली यांचीही केजरीवाल माफी मागण्याची शक्यता आहे. मात्र कोर्टबाजीमध्ये अडकण्याची केजरीवाल यांची सध्या मन:स्थिती नसल्याचे कळते.
केजरीवालांच्या माफीने ‘आप’मध्ये फुटीची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:09 AM