लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीत भाजपचा सलग तिसऱ्यांदा ‘क्लीन स्वीप’ रोखण्यासाठी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या निवडणूक प्रचारात हुकमाचा एक्का ठरणार आहेत. केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी सोमवारी ‘आप’च्या नेत्यांनी निवडणूक प्रचार मोहिमेचा विषय बदलला.
‘जेल का जबाब वोट से’ असे शीर्षक असलेल्या नव्या पोस्टरसह ‘आप’ने केजरीवाल यांना दिल्लीच्या राजकारणात अधिक ठळकपणे केंद्रस्थानी आणले. दिल्लीत २०१४ आणि २०१९ साली भाजपने लोकसभेच्या सातपैकी सात जागा जिंकल्या; पण यंदा ‘क्लीन स्वीप’ची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी करून ‘आप’ चार जागांवर लढत आहे.
आज अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणीnअरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती स्वराना कांता शर्मा यांच्यापुढे ही सुनावणी होईल. सध्या केजरीवाल तिहार जेलमध्ये आहेत
‘केजरीवाल हटाव’ची याचिका प्रसिद्धीसाठी nकेजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली आहे आणि याचिकाकर्ता त्यांच्यावर जबर दंड लादण्यास पात्र आहे, अशी टिपणी दिल्ली उच्च न्यायालयाने केली.