नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आमदार निधी वाढविण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यासंदर्भात आज विधानसभेत माहिती दिली. सध्या दिल्लीच्या आमदारांना चार कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. मात्र, आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
आमदारांचा निधी वाढविण्याच्या मुद्दावरुन दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वाद सुरु होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने आमदारांचा निधी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी यासंदर्भातील फाईल परत पाठविली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारचे अधिकार वाढविले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने आमदारांचा निधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.