नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर चढला असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप नेते मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
दिल्लीत शुक्रवारी जे काही झालं ते सर्वकाही 'आप'कडून घडवण्यात आले आहे. शाहीन बागेतील आंदोलन देशविरोधी झाले आहे. तेथूनच शरजील इमाम निघाला आणि तेथूनच अमानतुल्लाह खान आला आहे. गोळीबार करणार युवक यांचाच ('आप'चा) आहे. एवढ्या लवकर कोण कसकाय स्वत:ला भाजप समर्थक म्हणू शकतो, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.
दरम्यान केजरीवाल सरकारचा अंत होणार आहे. त्यामुळे ते अशा घटना घडवून आणत आहेत. गोळीबार करणारा युवक हा आम आदमी पक्षाकडूनच पाठविण्यात आला होता. कारण भाजप समर्थक कधीही अशी कृती करणार नाही, असंही तिवारी यांनी नमूद केले. आम्हाला दिल्लीत शांतता आणि सुरक्षा हवी आहे. मात्र त्यांच्याकडून दिल्लीत आग लावण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनताच निर्णय घेईल, त्यांना दिल्ली कशी हवी, असंही तिवारी म्हणाले.