ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.४ - 'आम आदमी पक्षा'च्या दृष्टीने तुम्ही जे काही केलं आहे त्याबद्दल तुम्हाला देव आणि इतिहास कधीच माफ करणार नाही, अशी टीका प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात केली आहे. 'आप'मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रशांत भूषण यांनी खुल्या पत्राच्या माध्यमातून केजरीवाल यांना विरोध केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तसेच त्यांना प्रवक्ते पदावरूनही हटविण्यात आले. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपले म्हणणे ऐकून न घेता आपल्याला व इतर साथीदारांना मारहाण करण्यात आल्याचा दावाही यादव व भूषण यांनी केला होता. त्याबद्दलह त्यांनी पत्रात रोष व्यक्त केला आहे.
' पक्षासोबत तुम्ही जे करत आहात ते पाहून देव व इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही. दिल्लीतील जनतेने बहुमताने निवडून दिलेले असताना, नशीबही साथ देत असताना आपण आपले सर्वश्रेष्ठ गुण दाखवून संधीचं सोन कराला हवं. मात्र पक्षात आपली हुकूमत गाजवून तुम्ही लाखो समर्थकांचा पक्षावरील विश्वास तोडत आहात. पाच वर्ष दिल्लीचं सरकार तुम्ही चालवालही, त्यामुले सगळं बरोबर होईल असं तुम्हाला वाटतं. काँग्रेस, भाजपा हे पक्षही तसाच विचार करतात. पण आपण जे स्वच्छ, तत्वनिष्ठ राजकारण व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन समोर ठेवून सुरूवात केली होती, ते खूप मोठं होतं. तुमच्या हुकूमशाहीमुळे ते दु:स्वप्नच ठरू शकतं, अशी टीका भूषण यांनी केली आहे.