ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवाल यांचा 'जगभरातील ५० महान नेत्यांच्या' यादीत समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध 'फॉर्च्यून' मॅगिझनच्या या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मात्र या यादीत समावेश झालेला नाही. दिल्ली सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दलही मॅगझिनने केजरीवालांचे कौतुक केले आहे.
खुद्द अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल ट्विट केले आहे. ' प्रथम वॉशिंग्टन पोस्टने आम आदमी क्लिनिक्सचे कौतुक केले, आणि आता आता फॉर्च्यून मासिकाने दिल्लीत राबवण्यात आलेल्या सम-विषम वाहतूक योजनेचे कौतुक केले आहे' असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नमूद केले आहे.
दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात १५ दिवसांसाठी सम-विषम वाहतूक योजनेचा प्रयोग राबवला होता, जो यशस्वी ठरला. येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा १५ दिवसांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
फॉर्च्युन मासिकाच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज हे अव्वल स्थानावर असून केजरीवाल ४२ व्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुस-या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की (३), अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली (२२) आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडी (४८) यांचाही या यादीत समावेश आहे.
First Washington Post praised Delhi's Aam Admi clinics. Now Fortune applauds Delhi's good governance esp odd-even pic.twitter.com/szfSf6Tg5H
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 24, 2016