ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २८ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सादर केलेले लोकपाल विधेयक म्हणजे 'महाजोकपाल' आहे अशा शब्दांत 'आप'चे (आम आदमी पक्ष) माजी नेते व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जनलोकपालच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून समोर आलेल्या जनलोकपाल विधेयकातील तरतुदी वगळून केजरीवाल सरकारने सादर केलेले लोकपाल विधेयक महाजोकपाल आहे, असे सांगत भूषण यांनी या विधेयकातील तरतुदी पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकाऱ्यांना ‘जाणीवपूर्वक‘ या प्रस्तावित विधेयकाच्या कक्षेत आणले गेले आहे, ज्यामुळे दोन्ही संस्थांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा आरोप भूषण यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच केजरीवाल यांनाही प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. म्हणूनच त्यांनी या विधेयकाच्या तरतुदी जाहीर केल्या नाहीत. सक्षम लोकपाल असावा, अशी केजरीवाल यांचीच इच्छा नाही, अशी टीकाही भूषण यांनी केली. या विधेयकातील तरतुदी पाहिल्या, की त्याचे तपशील जाहीर का केले नाहीत हे कळते. हे ‘महाजोकपाल‘ विधेयक विधानसभेत मंजूर करायचे व नंतर केंद्र सरकारने त्याला आक्षेप घेतला की दोषारोप करायचे अशी केजरीवाल यांची खेळी आहे. ‘हम करना चाहते थे; लेकिन नही करने दिया जी, असा कांगावा करायला केजरीवाल मोकळे, असेही भूषण म्हणाले.
केजरीवालांचे लोकपाल म्हणजे 'महाजोकपाल' - प्रशांत भूषण
By admin | Published: November 28, 2015 3:32 PM