नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लवकरच आम आदमी पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार आहे. लवकरच केजरीवाल यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणार असून नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. अर्थात आधीच्या मंत्रीमंडळात बदल होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. केजरीवाल तिसऱ्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे.
दिल्ली विधानसभेतील जुने सर्व मंत्री पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं देण्यात येणार याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाचे सर्व कॅबिनेटमंत्री पुन्हा विजयी झाले आहेत. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र त्यावर आता पूर्णविराम लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांना विजय मिळवला आहे. 70 विधानसभा सदस्यांच्या सभागृहात आपने 62 जागा जिंकल्या आहेत. तर विरोधात असलेल्या भाजपला आठ जागांवर विजय मिळण्यात यश आले आहे. काँग्रेसला गेल्या वेळप्रमाणेच यंदाही खातं उघडता आले नाही.