केजरीवालांसाठी खडतर मार्ग?
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
केजरीवालांसाठी खडतर मार्ग?
केजरीवालांसाठी खडतर मार्ग?भाजपचे दिल्लीतील खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी शपथविधी सोहळ्याकडे फिरविली पाठनितीन अग्रवालनवी दिल्ली : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीतील सत्तेची धुरा हाती घेतली असली तरी दिल्लीच्या विकासाच्या दृष्टीने केजरीवाल सरकारसाठी पुढचा मार्ग मात्र तेवढा सोपा नाही.शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करूनही ना पंतप्रधान आले, ना केंद्रीयमंत्री. दिल्लीतील भाजपचे खासदारही आले नाहीत. हे लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला असला तरी प्रत्यक्षात यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळविणे केजरीवाल यांना कठीणच जाईल, असे दिसते.महाराष्ट्राच्या दौर्यावर असल्याने पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नव्हते. तथापि, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनीही अन्य कार्यक्रमाला प्राधान्य देत शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविली. दिल्लीचा विकास आणि अन्य सरकारी कामकाजासाठी या दोन केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल सरकारला गरज भासणार आहे.दिल्लीतील भाजपच्या सातही खासदारांना केजरीवाल यांनी अगत्याने शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. तेही रामलीला मैदानावर दिसले नाहीत. निमंत्रण उशिरा मिळाल्याने शपथविधी सोहळ्यात सहभागी होता आले नाही, अशी सबब दिल्लीतील एका खासदाराने सांगितली. निवडणुकीत केजरीवाल यांनी बरीच आश्वासने दिली आहेत. नवीन इस्पितळ, महाविद्यालये सुरू करण्यासह दिल्लीवासीयांना हक्काची घरे देणे तसेच महिलांना सुरक्षा देण्याचा वायदा केजरीवाल यांनी केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी केजरीवाल सरकारला केंद्र सरकारची पदोपदी मदत लागेल. दिल्ली विकास प्राधिकरणामार्फत (डीडीए) घरे उभारली जाणार असून डीडीए केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाच्या, तर सुरक्षेचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांच्या कक्षेत येतो. सरकार चालविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लागेल, असे केजरीवाल यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री आणि नागरी विकासमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर शिष्टाचार म्हणून भाजपच्या ७ खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते.माकन आणि किरण बेदींचा सल्ला घेणारमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्या सल्ल्याने काम करणार असल्याचे सांगितले आहे. किरण बेदी यांना मोठी बहीण मानतो. आमचे सरकार आवश्यक तेथे त्यांचा सल्ला घेईल. कारण त्यांच्या पाठीशी दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. अजय माकन यांच्याशीही आम्ही सल्लामसलत करू. केंद्रीय मंत्री म्हणून योजना आखणे आणि त्या लागू करण्याचा त्यांना अनुभव आहे.केजरीवाल यांच्या या वक्तव्याचे माकन आणि भाजपने स्वागत केले आहे.सकारात्मक विधान करून केजरीवाल यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो, असे माकन म्हणाले.केजरीवाल दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करतील. यासाठी सहकार्य केले जाईल, असे भाजप नेते श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले.