कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महिंद्रा कंपनीला चांगलीच अद्दल घडविली होती. गेल्या महिन्यात बोलोरो पाहण्यासाठी खराब कपड्यांमध्ये गेल्याने शोरुमच्या सेल्समॅनने तुझ्या खिशात १० रुपये तरी आहेत का, असे म्हणत अपमानीत केले होते. यानंतर त्या शेतकऱ्याने अर्ध्या तासात दहा लाख रुपये आणून त्या सेल्समन समोर आणून ठेवले होते. परंतू, तेव्हा त्याला लगेचच गाडी मिळाली नव्हती. यावरून महिंद्रा कंपनीची चांगलीच नाचक्की झाली होती. आता या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे सोशल मीडियावर महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. यामुळे दुसऱ्या दिवशी आनंद महिंद्रांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच झापत त्या शेतकऱ्याची माफी मागण्यास सांगितले होते. आता त्या शेतकऱ्याला महिंद्राची बोलेरो पिकअप (Mahindra Bolero Pickup) देण्यात आली आहे. आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कंपनीने शेतकरी केंपेगौडाचे (Kempegowda R L) स्वागत केले आहे.
केंपेगौडाने सांगितले की, महिंद्रा शोरुमचे कर्मचारी माझ्या घरी आले होते माफी मागितली. मला बोलेरो पिकअप वाहन पसंत होते. मी ते कर्ज काढून घेतले आहे. डाऊन पेमेंट केले आहे. शोरुमवाल्यांनी शुक्रवारी बोलेरो पिकअप दिली आहे. याद्वारे मी भाज्या आणि नारळाची वाहतूक करणार आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्हनं ट्विटरवर एक अधिकृत निवेदन जारी करत केम्पेगौडा यांची माफी मागितली. 'केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांना २१ जानेवारीला आमच्या डिलरशिपकडून त्रास झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. याबद्दल योग्य पावलं उचलण्याचं वचन आम्ही दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही योग्य पावलं उचलली आहेत आणि आता हा वाद मिटला आहे,' असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
काय होता प्रकार...केम्पेगौडा एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते. मात्र सेल्समननं त्यांची खिल्ली उडवली. केम्पेगौडा यांनी महिंद्रा बुलेरोची माहिती घेतली. दोन लाख डाऊनपेमेंट आणि त्याच दिवशी डिलेव्हरी देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. सेल्स टीमनं त्यास नकार दिला. त्यावर १० लाख रुपये एकरकमी भरतो असं केम्पेगौडा यांनी म्हटलं. यावरून सेल्स टीमनं जाणूनबुजून त्यांची थट्टा केली.
१० लाख दूर राहिले. तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. अर्ध्या तासात १० लाख रुपये रोख आणल्यास आजच गाडीची डिलिव्हरी करू, असं सेल्समन म्हणाला. त्यानंतर केम्पेगौडा यांनी लगेचच त्यांच्या मित्रांना रोख रकमेची व्यवस्था करण्यास सांगितलं. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी १० लाख रुपये जमवले. मात्र त्यानंतर सेल्स टीमनं कार डिलिव्हरीसाठी किमान ३ दिवस लागतील असं सांगितलं.