केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील चेरुपुझा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चेरुपुझा येथील एका घरात तीन मुले आणि त्यांचे आई-वडील असे पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. केरळ पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या प्रकरणाकडे हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अंगांनी पाहून पोलीस तपास करत आहेत.
केरळ पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये हे प्रकरण हत्या आणि आत्महत्येचं वाटत आहे. गेल्या आठवड्यात लग्न करणाऱ्या या जोडप्याने मुलांची हत्या करून नंतर गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
त्यांनी सांगितले की, मुलांचे मृतदेह शिडीवर आणि दम्पत्याचे घरातील छताच्या पंख्यावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. मृत महिलेची तिन्ही मुलेही तित्या आधीच्या पतीपासून झालेली होती. ही घटना २३-२४ मेच्या दरम्यान घडली. परिसरातील लोकांनी याबाबतची माहिती आज सकाळी पोलिसांना दिली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही केरळमधील एका कुटुंबात अशी घटना घडली होती. त्यावेळी एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी कौटुंबिक कारणांमुळे जीवन संपवले होते. त्यांनी भरतपुझा नदीत उडी मारून जीव दिला होता. आत्महत्या करण्यापूर्वी या लोकांनी आपण जीवन संपवण्यासाठी जात आहोत, असं आपल्या नातेवाईकांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दोन मुलांसह चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले होते.