थिरुअनंतपुरम: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समारंभ साजरे करताना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही नियम धाब्यावर बसवून सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होत असून रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. केरळच्या थिरुअनंतरपुरममधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या तब्बल ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवदाम्पत्याचाही समावेश आहे.लग्न सोहळ्यांसाठी ५० जणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र थिरुअनंतपुरममध्ये १७ जुलैला संपन्न झालेल्या लग्नाला सव्वाशेहून अधिक जण उपस्थित होते. केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या चेंगला पंचायतीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाला उपस्थित असलेल्या ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वर आणि वधूचाही समावेश आहे. लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली.या प्रकरणी बडीयुडुक्का पोलिसांनी वधूच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांना १० हजारांचा दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. सर्वप्रथम वधूच्या वडिलांचाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे वधूचे वडील त्यांच्या जावयासोबतच काही महिन्यांपूर्वी दुबईहून आले होते.लग्नाला उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाची बाध झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर इतरांना होम क्वारंटिन करण्यात आलं आहे. यानंतर कासरागोड, मंजेश्वरम, होसदुर्ग, कुंबाला आणि निलेश्वरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्बंध वाढवण्यात आले असून परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील थांबवण्यात आली आहे.
एक रिसेप्शन अन् वाढलं टेन्शन; वधू-वरासह तब्बल ४३ जणांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 7:22 PM