Kerala Crime : केरळमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबू यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी कन्नूरचे जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबू यांना सहकाऱ्यांनी त्यांची बदली झाल्यानंतर निरोप दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन बाबू यांनी आत्महत्या केली आहे. निरोप समारंभात घडलेल्या एका घटनेनंतर नवीन बाबू यांनी आत्महत्या केल्याचा दावा आता करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बाबू यांचे घर गाठून त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
कन्नूर येथे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबू यांनी निरोप दिला होता. मात्र एका दिवसानंतर, नवीन बाबू हे पल्लीकुन्नू येथील त्यांच्या क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की नवीन बाबू हे एडीएम म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी एक दिवस अगोदर त्यांच्या मूळ जिल्ह्यात पठाणमथिट्टा येथे जाणार होते. पण मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्याच्या अधिकृत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नवीन बाबू यांच्या मृ्त्यूनंतर त्यांच्या निरोप समारंभात घडलेल्या त्या घटनेची आता चर्चा सुरु झाली आहे.
कन्नूर जिल्हा पंचायत अध्यक्ष पीपी दिव्या यांनी सोमवारी आयोजित केलेल्या निरोप समारंभात नवीन बाबू यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही आरोप केले होते. भर कार्यक्रमात नवीन बाबू यांना जिल्हा पंचायत अध्यक्ष पीपी दिव्या यांनी केलेल्या आरोपांना सामोरे जावे लागले. पीपी दिव्या अधिकृत निमंत्रणाशिवाय या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सत्ताधारी सीपीआय(एम) च्या पीपी दिव्या यांनी चेंगलाई येथे पेट्रोल पंप मंजूर करण्यास अनेक महिन्यांपासून विलंब केल्याबद्दल नवीन बाबूंवर टीका केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, पीपी दिव्या यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही दिव्या या तावातावाने या कार्यक्रमात आल्या. व्यासपीठावर बसून त्यांनी नवीन बाबू यांच्या कारकिर्दीविषयी अपमानजनक वक्तव्य करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
दिव्या यांनी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबूंवर बदली झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी मंजुरी दिल्याचा आरोप केला आणि अचानक मंजूरी देण्यामागचे कारण आपल्याला माहीत असल्याचे म्हटलं. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि नवीन यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन दिवसांत याची माहिती समोर येईल, असेही दिव्या यांनी म्हटलं. त्यानंतर दिव्या यांनी स्मृतीचिन्ह देण्याच्या कार्यक्रमासाठी थांबण्यास नकार दिला आणि स्टेजवरून निघून गेल्या.