Breaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 08:58 PM2020-08-07T20:58:06+5:302020-08-07T21:08:11+5:30
दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान दुर्घटनाग्रस्त झालं
तिरुअनंतपूरमः केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान घसरलं, त्या विमानात 190हून अधिक प्रवासी होते. दुबई-कोझिकोड बोईंग 737 या विमानात 191 प्रवासी होते आणि ते संध्याकाळी 7:41 वाजता विमानतळावर दाखल झाले. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचे दिसून आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 जण जखमी झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होते. या विमानात 191हून प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कसं घसरलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX-1344 विमान प्रवासी घेऊन येत होते.Kerala: An Air India Express plane skidded during landing at Karipur Airport, Kozhikode. More details awaited. pic.twitter.com/TxrQEzxPDV
— ANI (@ANI) August 7, 2020
अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी 7.45 वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झालं, तेव्हा त्यात 191 प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. डीजीसीएने घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.