तिरुअनंतपूरमः केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान घसरलं, त्या विमानात 190हून अधिक प्रवासी होते. दुबई-कोझिकोड बोईंग 737 या विमानात 191 प्रवासी होते आणि ते संध्याकाळी 7:41 वाजता विमानतळावर दाखल झाले. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचे दिसून आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 जण जखमी झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी 7.45 वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झालं, तेव्हा त्यात 191 प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. डीजीसीएने घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.