नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीच्या (Kerala Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची गुरुवारी घोषणा केली. केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदावर म्हणून भाजपने 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन (E Sreedharan) यांची निवड केली. आता मात्र या प्रकरणाने नवीन वळण घेतले असून, भाजपच्या एका मंत्र्याने यावरून युटर्न घेतल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 new turn in bjp for cm candidate of e sreedharan)
भारतीय जनता पक्षाकडून मेट्रोमॅन ई. श्रीधरन केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे केंद्रीयमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी गुरुवारी जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वीच व्ही. मुरलीधरन यांनी यावरून युटर्न घेतल्याची माहिती मिळाली आहे. केरळचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृतरित्या निर्णय झालेला नाही, असे व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.
भाजपकडून अधिकृत घोषणा नाही!
भाजपकडून अद्याप अधिकृतरित्या ई. श्रीधरन यांचे नाव केरळचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्टमधून मला ही गोष्ट समजली. मागाहून पक्षप्रमुखांकडे विचारणा केली असताना अशी कोणताही घोषणा केली नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले, अशी सारवासारव व्ही. मुरलीधरन यांनी केली आहे.
राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
ई. श्रीधरन योग्य उमेदवार
ई. श्रीधरन भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. केरळमधील भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी म्हटले होते की, ई. श्रीधरन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाकडून निश्चित व्हावे, अशी विनंती करण्यात आली होती. एलडीएफ आणि युडीएफ यांच्यामधील पूल आता तुटत चालला आहे. ई. श्रीधरन यांनी आपल्या कारकीर्दीत कोणताही भ्रष्टाचार न करता अनेक पुलांची निर्मिती केली आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेच असावेत, असे आमचे मत आहे. पुढे पक्षप्रमुख घेतील, तो निर्णय अंतिम असेल, असे के. सुरेंद्रन यांनी म्हटले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर, २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वेळा त्यांनी नरेंद्र मोदींना एक चांगला नेता म्हणून संबोधले होते. पंतप्रधानपदाच्या मोदींच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्यांमध्येही ई. श्रीधरन यांचे नाव होते.