केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. राज्यात सत्ताधारी डावी आघाडी विरुद्ध डावी आघाडी असा थेट मुकाबला होत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) विरुद्ध काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी (युडीएफ) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून सत्ता मिळते. केरळचा राजकीय इतिहास तसा राहिलेला आहे. मात्र यंदा सत्तापरिवर्तन होणार नाही, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. केरळमध्ये सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी लोकशाही आघाडी सत्तेत आहे. मात्र यंदा परिवर्तन होणारचा असा ठाम विश्वास काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. एक्झिट पोलचे आकडे आम्हाला मान्य नाहीत. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असं चेन्निथला म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येवो किंवा गृहमंत्री अमित शहा भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर केरळमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून चेन्निथला यांनी जोरदार टोलेबाजी केली. मोदी येवोत वा शहा, भाजपला एकही जागा मिळणार नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी मोदी, शहांचा वेळ वाया घालवू नये. कारण इथे भाजपचं काही होऊ शकत नाही. इथली जनता परिस्थिती उत्तम जाणते. भाजपला राज्यात कोणतंही स्थान नाही, हे मतदारांना माहीत आहे. आमची थेट लढत एलडीएफसोबत आहे, असं चेन्निथला यांनी सांगितलं.नुकत्याच समोर आलेल्या काही एक्झिट पोल्सनुसार केरळमध्ये एलडीएफचीच सत्ता कायम राहू शकते. याबद्दल विचारलं असता, हा एक्झिट पोल नसून केवळ सर्वेक्षण आहे. आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही सत्ता स्थापन करू आणि राज्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचं सरकार भ्रष्टाचारात बुडालेलं असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांच्या मनात सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन नक्की होईल आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होईल, असं चेन्निथला म्हणाले.
"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 6:20 PM