देशातील 'या' राज्याचे नाव बदलणार, विधानसभेत ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:54 PM2023-08-09T14:54:42+5:302023-08-09T14:55:12+5:30
कलम ११८ अंतर्गत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला.
केरळचे नाव लवकरच बदलून 'केरळम' करण्यात येणार आहे. यासाठी केरळ विधानसभेत आज एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. राज्याला मल्याळममध्ये 'केरळम' म्हणतात, परंतु इतर भाषांमध्ये ते अजूनही केरळ आहे, असे ठराव मांडताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले.
कलम ११८ अंतर्गत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारला सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये आणि संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये केरळचे नाव बदलून 'केरळम' करण्याची विनंती केली.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष यूडीएफने कोणतीही दुरुस्ती किंवा बदल न सुचवता हा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर विधानसभा अध्यक्ष ए.एन.शमसीर यांनी समर्थनाच्या आधारे हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्याची घोषणा केली.
संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्या राज्याचे केरळ हे नाव लिहिले आहे, असे पिनाराई विजयन म्हणाले. तसेच, आम्ही केंद्र सरकारला राज्यघटनेच्या कलम ३ अन्वये केरळममध्ये सुधारणा करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची आणि घटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये केरळ नाव बदलून 'केरळम' ठेवण्याची विनंती करतो, असेही पिनाराई विजयन म्हणाले.