चिंताजनक! केरळमध्ये गेल्या ७ दिवसांत दररोज सरासरी १२५ जणांचा कोरोनानं मृत्यू, रुग्णवाढीचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:48 PM2021-08-30T18:48:11+5:302021-08-30T18:48:43+5:30
Kerala Covid Cases: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही असं केंद्राकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यात देशात केरळ राज्यानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे.
Kerala Covid Cases: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही असं केंद्राकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यात देशात केरळ राज्यानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं केरळ केंद्रस्थान तर ठरतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देखील नुकताच केरळचा दौरा केला. यानंतर स्थानिक आरोग्य यंत्रणांना कोरोना नियंत्रणासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं होणाऱ्या वाढीमागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य पद्धतीनं होत नसल्याचं कारण दिलं जात आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या गेल्या २४ किंवा ४८ तासांत संपर्कात आलेल्या व्यक्तीपर्यंत प्रशासन पोहोचण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे संबंधित नागरिक स्वत:ला आयसोलेट करू शकत नाहीयत आणि कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. केंद्र सरकारनंही याबाबत स्थानिक प्रशासनाला अलर्ट केलं आहे.
केरळमध्ये काल एकूण २९ हजार ८३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २८ ऑगस्ट रोजी ३१ हजार २६५ रुग्ण आढळले होते. २७ ऑगस्ट रोजी ३२ हजार ८०१, २६ ऑगस्ट रोजी ३० हजार ७७, २५ ऑगस्टला ३१ हजार ४४५ आणि २४ ऑगस्ट रोजी २४ हजार २९६ रुग्ण आढळून आले होते. गेल्या सात दिवसांची ही आकडेवारी पाहता दरदिवशी सरासरी २७ हजार रुग्णवाढ केरळमध्ये होत आहे. तर गेल्या सात दिवसांत दररोज सरासरी १२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. राज्यात आतापर्यंत १०.६ टक्के लोकांचं लसीकरण झालेलं आहे.