याला म्हणतात नशीब! दुपारी 2 वाजता बँकेकडून संलग्नीकरणाची नोटीस, 3.30 वाजता 70 लाखांची लागली लॉटरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:57 AM2022-10-14T11:57:44+5:302022-10-14T11:58:37+5:30
पुकुंजू यांनी बँकेकडून 12 लाखांचे कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यास पुकुंजू असमर्थ होते.
कोल्लम : कोणाचं नशीब कधी उजळेल, हे सांगता येत नाही. केरळमध्ये एका व्यक्तीला 70 लाखांची लॉटरी लागली आहे. तेही अशा वेळी जेव्हा त्याला फक्त नशिबाची साथ होती. खरंतर हे प्रकरण कोल्लम जिल्ह्यातील मैनागपल्लीचे आहे. 12 ऑक्टोबरचा दिवस येथील पुकुंजू हे कधीही विसरणार नाहीत. 40 वर्षीय पुकुंजू हे मासेविक्रेते कर्जबाजारी होते. बँकेने त्याच दिवशी पुकुंजू यांना संलग्नीकरणाची नोटीस बजावली होती. पण, नशिबाने अशी साथ दिली की, त्यांच्या सगळ्याच अडचणी दूर झाल्या आणि ते श्रीमंतही झाले.
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बँकेने पुकुंजू यांना दुपारी 2 वाजता संलग्नीकरणाची नोटीस दिली होती. पुकुंजू यांनी बँकेकडून 12 लाखांचे कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यास पुकुंजू असमर्थ होते. पण, बँकेची नोटीस आल्यानंतर पुकुंजू यांचे नशीब उजाळले. दीड तासानंतर त्यांना 70 लाखांची लॉटरी लागल्याचा त्यांच्या भावाचा फोन आला. पुकुंजू हे आपल्या स्कूटरवर उत्तर मैनागपल्ली भागात मासे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
घर बांधण्यासाठी पुकुंजू यांनी आठ वर्षांपूर्वी कॉर्पोरेशन बँकेकडून 7.45 लाखांचे कर्ज घेतले होते. तेव्हापासून कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आता त्यांच्यावर व्याजासह जवळपास 12 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. बँकेकडून संलग्नीकरणाची नोटीस मिळाल्यावर तो खूप अस्वस्थ होते. त्यांना आपले घर जाण्याची चिंता होती. बँकेने संलग्नीकरणाची नोटीस दिली, त्या दिवशी दुपारी 3.30 वाजता त्यांच्यासोबत ही घटना घडली, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आणि ते अक्षय लॉटरीचे सर्वोच्च पारितोषिक जिंकले.
दरम्यान, पुकुंजू यांचे वडील युसूफ कुंजू अनेकदा लॉटरी खरेदी करतात. पण पुकुंजू क्वचितच लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. मंगळवारी त्यांनी प्लामुतिल बाजार येथील लॉटरी विक्रेता गोपाल पिल्लई यांच्याकडून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तिकीट क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर पुकुंजू यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत लॉटरी जिंकल्याचा आनंद साजरा केला.