ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - राजधानी दिल्लीतील केरळ भवनमध्ये बीफ वाढण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंदू सेनेचा प्रमुख विष्णू गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. सोमवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास हिंदू सेनेच्या कार्यकर्त्याने फोन करून केरळ भवनच्या गेस्ट हाऊसमध्ये बीफ सर्व्ह करत येत असल्याची नोंदवली होती त्यानंतर पोलिसांनी तेथे प्रवेश करून कारवाई केल्याने वाद सुरू झालेला असताना पोलिसांनी हिंदू सेनेचा प्रमुख विष्णू गुप्ता याला टिळकनगर येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
केरळ भवनध्ये पोलिस शिरल्याने गदारोळ झाला असून पोलिसांच्या या कारवाईचा ‘छापा’ असा उल्लेख करून केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पोलीस कारवाईचा निषेध करून मोदी सरकारवर टीका केली. केरळ हाऊसवरील पोलीस कारवाई हा ‘संघराज्य रचनेवरील हल्ला’ आहे. जे भाजपाला आवडत नाही ते केरळचे मुख्यमंत्री खात आहेत, या संशयावरून दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांना केरळ हाऊसमध्ये घुसून अटक करणार काय? दिल्ली पोलीस भाजप-शिवसेनेसारखे वागत आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.