केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान काल साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने घेतली आहे. या स्फोटांनंतर काही तासांनंतर, त्याने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. दरम्यान, बॉम्बस्फोटातील आरोपी डॉमिनिक मार्टिनचे दुबई कनेक्शन समोर आले आहे.
डॉमिनिक मार्टिन हा अनेक वर्षांपासून दुबईत राहत असल्याचे तपासादरम्यान समोर आले. त्याने दुबईमध्ये इलेक्ट्रिक मॅन म्हणून काम केले आहे. डॉमिनिक मार्टिनला इलेक्ट्रिक सर्किट बनवण्याचे पूर्ण ज्ञान होते. डॉमिनिक मार्टिन दोन महिन्यांपूर्वीच भारतात परतला होता. डॉमिनिक मार्टिन जवळपास १५ वर्षांपासून दुबईत राहत असल्याचे सांगितले जात आहे. तो भारतात परतला आणि इंग्रजी विषयाचे लेक्चर घेत होता. तसेच, गेल्या साडेपाच वर्षांपासून थम्मन परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. डॉमिनिक मार्टिनचा मुलगा ब्रिटनमध्ये शिकत आहे. तर त्याची मुलगी एका आयटी कंपनीत काम करते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या दिवशी म्हणजेच रविवारी डॉमिनिक मार्टिन पहाटे ५.३० वाजता स्कूटरवरून घरातून निघाला होता. पत्नीने विचारणा केली असता त्याने उत्तर दिले नाही. केरळ पोलिसांनी त्याच्या घरातून पासपोर्ट आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी डॉमिनिक मार्टिनची पत्नी, मुलगी आणि घरमालकाचीही चौकशी केली आहे. याशिवाय, कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून डॉमिनिक मार्टिनच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. दुबईत तो कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत.
सदर स्फोटापूर्वी डॉमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह करून स्फोटामागील कारणही स्पष्ट केले होते. तसेच, डॉमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितले होते की, त्याला शोधण्याची गरज नाही. या स्फोटांची जबाबदारी घेत तो स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे. "मी यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणीशी सहमत नाही, जरी मी त्यांच्यापैकी एक आहे, परंतु त्यांची विचारधारा धोकादायक आहे. हा गट देशासाठी धोकादायक आहे. ते लोक लहान मुलांच्या मनात विष पसरवत आहेत. त्याची विचारधारा चुकीची आहे. ते खोटेपणा पसरवत आहेत. आज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान जे काही घडले, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मला शोधत कोणी येण्याची गरज नाही, कारण मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे डॉमिनिक मार्टिनने म्हटले होते. यानंतर त्याने पोलीस स्थानकांत जाऊन आत्मसमर्पण केले.
स्फोटात दोन ठार, ४१ जखमीकेरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर इतर जखमींप्रमाणेच कुमारी (५३) या मूळच्या थोडुपुझाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ती ९० टक्के भाजली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र काही वेळापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी आली आहे.