केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटांची जबाबदारी डोमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने घेतली आहे. या स्फोटांनंतर काही तासांनंतर, त्याने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. सदर स्फोटापूर्वी डोमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह करून स्फोटामागील कारणही स्पष्ट केले होते. तो दावा करतो की तो ख्रिश्चन धर्माच्या यहोवाच्या साक्षीदार गटाचा देखील आहे. पण त्याची विचारधारा त्याला आवडत नाही. तो त्यांना देशासाठी धोका मानतो. कारण ते लोक देशातील तरुणांच्या मनात विष कालवत आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या प्रार्थना सभेत बॉम्बस्फोट केला.
डोमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह दरम्यान देखील सांगितले की, त्याला शोधण्याची गरज नाही. या स्फोटांची जबाबदारी घेत तो स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे. "मी यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणीशी सहमत नाही, जरी मी त्यांच्यापैकी एक आहे, परंतु त्यांची विचारधारा धोकादायक आहे," असे मार्टिन यांनी फेसबुक लाइव्ह मुलाखतीत सांगितले. हा गट देशासाठी धोकादायक आहे. ते लोक लहान मुलांच्या मनात विष पसरवत आहेत. त्याची विचारधारा चुकीची आहे. ते खोटेपणा पसरवत आहेत. आज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान जे काही घडले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मला शोधत कोणी येण्याची गरज नाही, कारण मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचं मार्टिन म्हणाले. यानंतर त्याने पोलीस स्थानकांत जाऊन आत्मसमर्पण केले.
केरळ पोलिसांनी पुष्टी केली आहे की, त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तीचे नाव डॉमिनिक मार्टिन आहे. पोलीस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये मार्टिनचा हात आहे की नाही हे चौकशी आणि तपासानंतरच सांगता येईल. दुसरीकडे, संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांतील पोलीस प्रमुखांना त्यांच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ पोलिस सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि जातीयवादी आणि संवेदनशील पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दोन हजार लोकांच्या जीवाला होता धोका-
एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन समुदायाच्या यहोवाच्या साक्षीदार गटाची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय प्रार्थना सभेचा आज शेवटचा दिवस होता. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. सकाळी ९.३०च्या सुमारास एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. सर्वत्र गोंधळ माजला होता. या स्फोटात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ३९ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्रालयही तत्काळ कारवाईत आले. कोचीहून एनआयएचे एक पथक एर्नाकुलमला पाठवण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना फोन केला. मात्र, ते केरळऐवजी दिल्लीत हजर होते. गाझा हल्ल्याच्या निषेधार्थ ते दिल्लीत आले होते.
स्फोटात दोन ठार, ४१ जखमी
केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर इतर जखमींप्रमाणेच कुमारी (५३) या मूळच्या थोडुपुझाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ती ९० टक्के भाजली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र काही वेळापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी आली आहे.