कोची - शबरीमला मंदिरात दोन महिलांनी बुधवारी पहाटे प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. महिलांच्या या प्रवेशाला क्रांतीकारी पाऊल ठरविण्यात आले. पण, स्थानिक नागरिक आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी याचा कडाडून विरोध केला आहे. यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून आज राज्यात काळा दिवस साजरा करण्यात येत असून केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.
शबरीमला मंदिरात बुधवारी 40 वर्षांच्या दोन महिलांनी प्रवेश केला. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे महिलांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे 40 वर्षांपासूनची परंपरा खंडीत झाली असून या 2 महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहेत. मात्र, महिलांच्या या प्रवेशानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसात पाहायला मिळत आहेत. तेथील अनेक स्थानिक संस्था आणि संघटनांनी या घटनेचा विरोध केला आहे.
शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केरळ बंदची हाक देण्यात आली असून काही ठिकाणी गोंधळही झाला आहे. या गोंधळसदृश्य परिस्थितीत एकाचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.