तिरुवनंतपुरम - केरळमधील चर्चित गोल्ड स्मगलिंगमधील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि केरळच्या सीएमओचे माजी मुख्य सचिव शिवशंकर यांनी एका दहशतवाद्याला पळून जाण्यासाठी यूएईच्या वाणिज्य दूतावासाची मदत केली. स्वप्ना हिने दावा केला की, ४ जुलै २०१७ रोजी सीआयएसएफने यूएईच्या एका नागरिकाला युरया सॅटेलाईट फोनसह पकडले होते. या फोनाच्या वापरावर भारतात निर्बंध आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधील वाणिज्य दूतावासाकडून फोन आला होता, असा दावा तिने केला.
स्वप्ना सुरेश हिने सांगितले की, त्या दिवशी मला संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विजयन यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. त्यासाठी मी त्यांचे सचिव शिवशंकर यांना फोन केला आणि त्यांना याबाबत सांगितले. त्यावर शिवशंकर यांनी मी विजयन यांच्याशी बोलेन असे सांगितले, ५-१० मिनिटांत मला शिवशंकर यांचा फोन आला की, लिखित शपथपत्र देण्यासाठा एका अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात पाठवण्यास सांगण्यात आले. मी तसंच केलं.
स्वप्नाने दावा केला की, शपथपत्र दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सोडून दिले. तसेच या प्रकरणात पुढे कसलाही तपास झाला नाही. स्वप्ना पुढे म्हणाली की, इजिप्तमध्ये जन्मलेला यूएईचा नागरिक ३० जून रोजी केरळमध्ये उतरला. दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलांनी त्याला ४ जुलै रोजी पकडले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पुराव्यांसोबत छेडछाड केली. तसेच त्यातील काही पुरावे नष्टही केले.
केरळचे मुख्यमंत्री मुलीच्या हितांसाठी अवैध दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देतात. दरम्यान, मी मुख्यमंत्र्यांविरोधात यापुढेही गौप्यस्फोट करीन असा इशारा स्वप्ना सुरेश यांनी दिला.