"वायनाड दुर्घटनेनंतर काही तासांनी मिळाला अलर्ट", अमित शाहांच्या दाव्यावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:02 PM2024-07-31T20:02:25+5:302024-07-31T20:04:32+5:30
Wayanad landslides : मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्या दाव्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वायनाड भूस्खलनाच्या (Wayanad landslides) घटनेपूर्वी कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले. तसंच, आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नसल्याचेही ते म्हणाले.
वृत्तानुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत सांगितलं की, आपत्तीचा अंदाज लक्षात घेऊन केरळ सरकारला आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता. तसंच, आपत्तीपूर्वी जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे बहुतांश राज्ये लक्ष देतात, मात्र, केरळ सरकारनं आपत्तीबाबत जारी केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, असं अमित शाह यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, वायनाडमध्ये बचावकार्य सुरू आहे. ही एक वेदनादायक आपत्ती आहे. आतापर्यंत १४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये ७९ पुरुष आणि ६४ महिला आहेत. तसंच, १९१ लोक अजूनही बेपत्ता आहेत. आपत्तीग्रस्त भागातून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, असं पिनाराई विजयन यांनी सांगितलं.
काय म्हणाले अमित शाह?
सभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसंच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, "२३ तारखेलाच एनडीआरएफच्या ९ टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारनं २३ जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. २६ जुलैला २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं आम्ही आधीच सांगितलं होतं. केरळ सरकारनं काय केलं? लोकांचं स्थलांतर केलं नाही. स्थलांतर केलं असतं, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता."
वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?
"वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. जवान चांगलं काम करत आहेत. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुसऱ्यांदा अशी दुर्घटना घडली आहे. ५ वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडं लक्ष दिलं पाहिजं आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करण्यात यावे", अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.