“RSSच्या अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर”; CM पिनरई विजयन यांची सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:12 PM2023-07-22T23:12:28+5:302023-07-22T23:14:43+5:30
Pinarayi Vijayan on Manipur Violence: केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे, या शब्दांत पिनरई विजयन यांनी हल्लाबोल केला आहे.
Pinarayi Vijayan on Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. यातच आता केरळचेमुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मणिपूरच्या घटनेवरून सडकून टीका केली आहे.
मागील ७० दिवसांपासून ईशान्यकडील मणिपूरमध्ये अशांतता आहे. ३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. या राज्यातून अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत, त्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. यावर आता प्रतिक्रिया देताना केरळचेमुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
RSSच्या अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर
देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या अजेंड्यामुळे मणिपूरचे दंगलग्रस्त भूमीत रुपांतर झाले आहे. संघ परिवार तिथे द्वेषाची पेरणी करत आहे. दंगलीच्या नावाखाली मणिपूरमध्ये ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केले जात आहे. ख्रिश्चन आदिवासी समुदायाच्या चर्चवर हल्ले केले जात आहेत, असा मोठा आरोप पिनरई विजयन यांनी केला. तिरुवनंतपुरममध्ये जारी केलेल्या निवेदनात पिनरई विजयन यांनी हा हल्लाबोल केला आहे.
अत्यंत घृणास्पद आणि क्रूर पद्धतीने वागणूक दिली
मणिपूरमधून दररोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. मानवी सदसद्विवेक बुद्धीला लाजवणारे अत्यंत भयानक दृश्य मणिपूरमधून वारंवार समोर येत आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांचे काही दृश्य आता समोर आली आहेत. कुकी समुदायातील महिलांना हिंसक जमावाने अत्यंत घृणास्पद आणि क्रूर पद्धतीने वागणूक दिली आहे, असे टीकास्त्र विजयन यांनी सोडले.
केंद्र सरकारचे मौन आणि RSSचा अजेंडा आता उघडा पडतोय
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कर्तव्य बजावत आहेत, तेच लोक हिंसाचाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना पराभूत करणे, ही लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे, असे पिनरई विजयन यांनी निवेदनात म्हटले आहे.