तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी केरळ विधानसभा सत्रात अविश्वास ठरावावर झालेल्या चर्चेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसची अवस्था बिकट आहे आणि बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहत आहेत, असे पी. विजयन यांनी म्हटले.
काँग्रेस आपले नेतृत्व ठरविण्यास असमर्थ आहे, तर पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांना 'भाजपाचे एजंट' म्हणत आहेत. पक्षाचे बहुतेक नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपाच्या कॉलची वाट पाहात आहेत, असा दावा पी. विजयन यांनी केला आहे.
काँग्रेसमधील नेतृत्त्वावरून घडलेल्या संकटावर पी. विजयन यांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वात दोन गटांमध्ये फूट पडली असून, त्यावर सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत एक गट या मागणीवर ठाम होता तर दुसरा गट स्वतःच गांधी कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवण्याच्या बाजूने होता.
यावरुन, केरळ विधानसभेत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. "एकीकडे त्यांनी येथे अविश्वास प्रस्ताव दिला आहे, तर दुसरीकडे दिल्लीत अविश्वास प्रस्ताव चालला आहे. तेथे त्यांचे नेते एकमेकांना भाजपा एजंट म्हणत आहेत. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना आपण भाजपाचे एजंट नाही असे सर्वांसमोर सांगावे लागले. मात्र नंतर त्यांनी आपले म्हणणे मागे घेतले," असे पी. विजयन यांनी म्हटले.
याचबरोबर, पी. विजयन यांनी काँग्रेस पक्षाने १९८० च्या दशकात केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली. ज्यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते की, केरळमध्ये लेफ्ट पार्टी सत्तेत पुन्हा कधीच येणार नाही. मात्र, त्यानंतर लेफ्ट पार्टी सत्तेत चारवेळी आली, असे पी. विजयन यांनी म्हटले.
"काँग्रेसमध्ये नेता निवडण्याची क्षमता नाही. वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्व बदलण्याची मागणी केली. सोनिया गांधी राजीनामा देण्यास सहमत होत्या. राहुल गांधी यांनी यापूर्वीच पदावर येण्यास नकार दिला आहे. या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून कधी भूमिका घेतली आहे का?", असा सवाल पी. विजयन यांनी केला.
दरम्यान, केरळ विधानसभेत एलडीएफ सरकारविरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने अविश्वासदर्शक ठराव आणला. मात्र, एलडीएफच्या बहुमतामुळे अविश्वासदर्शक ठरावाने टिकाव धरला नाही. केरळ सरकारविरोधात १५ वर्षात पहिल्यांदाच अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला.
आणखी बातम्या...
- "राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"
- महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा
- बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब
- गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!
- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल
- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!