नवी दिल्ली : केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये पुन्हा एकदा 22 हजाराहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेली कोरोनाची संख्या आरोग्य तज्ज्ञांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
राज्य सरकारने आवड्यातील शनिवार व रविवार लॉकडाऊन (Lockdown in Kerala) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. तसेच, या दक्षिणेकडील राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यात 6 सदस्यीय टीम पाठविली आहे.
देशातील बर्याच राज्यात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. बुधवारीही केरळमध्ये 22 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 22,064 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 16,649 जण बरे झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 128 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या बाबतीत केरळ आघाडीचे राज्य होते, परंतु पुन्हा एकदा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. दररोज कोरोनाचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या यामुळे राज्यापासून केंद्र सरकारपर्यंतच्या अडचणी वाढल्या आहेत. केरळमध्ये कोरोनाची दररोज सरासरी 16 हजार नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत. सध्या संपूर्ण देशात कोरोनाची निम्मी संख्या केरळ राज्यातून येत आहे. केरळमध्ये सध्या दीड लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.