औषधाच्या नावाखाली विष पाजून प्रियकराची हत्या; कोर्टाने तरुणीला दिली मृत्यूदंडाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:09 IST2025-01-20T13:42:49+5:302025-01-20T14:09:13+5:30
केरळमधील २४ वर्षीय तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

औषधाच्या नावाखाली विष पाजून प्रियकराची हत्या; कोर्टाने तरुणीला दिली मृत्यूदंडाची शिक्षा
Sharon Raj Murder : प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळन्यायालयाने २४ वर्षीय महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेरोन राज हत्याकांडातील आरोपी ग्रीष्माला केरळमधील तिरुअनंतपुरम येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. २६ वर्षीय ग्रीष्माला न्यायालयाने दोषी ठरवलं. ग्रीष्माचा मामा निर्मल कुमार हा देखील पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्यामुळे निर्मललाही तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
२०२२ मध्ये शेरॉन राज (२३) या तरुणाचा मृत्यू झाला होती. मृत शेरॉन राज हा मूळचा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील परसाला येथील रहिवासी होता. ग्रिष्माला तिचा प्रियकर शेरॉन याला आयुर्वेदिक औषधात विषारी रसायन मिसळून दिल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेत शेरॉनचा मृत्यू झाला. कोर्टाकडून शिक्षा सुनावली जात असताना ग्रीष्मा शांत उभा राहिली होती. परंतु कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या शेरॉनच्या पालकांना अश्रू अनावर झाले होते.
नेयत्तींकारा जिल्हा सत्र न्यायालयाने ग्रीष्माचे मामा निर्मला कुमारन नायर यालाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवले. ग्रीष्माची आई सिंधू या प्रकरणात सहआरोपी होती पण पुराव्याअभावी तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत ग्रीष्माला दोषी ठरवण्यात आले. तिच्या मामाला आयपीसीच्या कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. हा गुन्हा जघन्य असून दोषीला कोणतीही सवलत मिळू नये, अशी टिप्पणी कोर्टाने केली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही निर्दोष तपास केल्याबद्दल पोलिस तपास पथकाचे कोर्टाने कौतुक केले.
शेरॉन राजला मुख्य आरोपी ग्रीष्माने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरमंचिराई येथील तिच्या घरी बोलावले होते. तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले. ११ दिवसांनंतर २५ ऑक्टोबर २०२२ रोजी शेरॉनचा रुग्णालयात मृत्यू झाला. याआधी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. याआधीही ग्रीष्माने शेरॉनला फळांच्या रसात पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळून पाजायचा प्रयत्न केला होता. पण कडवट चवीमुळे त्याने ते पिण्यास नकार दिला. त्यामुळे अयशस्वी ठरलेल्या ग्रीष्माने आयुर्वेदिक औषधातातून शेरॉनला संपवलं.
ग्रीष्मा त्यावेळी २२ वर्षांची होती. नागरकोइल येथील लष्करी जवानासोबत तिचे लग्न ठरले असल्यामुळे शेरॉन राजच्या हत्येचा कट रचला होता. शेरॉन राजने ग्रीष्मासोबत असलेले त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता. त्यामुळे ग्रीष्माने घरच्यांसह मिळून शेरॉनला संपवलं. सुरुवातीला ग्रीष्मा आणि शेरॉनचे नाते घट्ट होते. पण ग्रिष्माने दुसऱ्याशी साखरपुडा केल्यानंतर हे नाते बिघडले. ग्रीष्माने शेरॉनशी तिचे नातेसंबंध संपवण्याचा प्रयत्न केला होता. शेरॉनने वेट्टुकडू चर्चमध्ये ग्रीष्माशी प्रतीकात्मक लग्न केले आणि तिच्या कपाळावर 'सिंदूर' देखील लावले होते.