शेवटी आईच ती! ज्या मुलाने चाकूने सपासप वार केले, त्यालाच तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, कोर्टात म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:10 IST2025-03-10T18:09:57+5:302025-03-10T18:10:32+5:30
Kerala Crime News: मुलं कशीही असली, ती तिच्यासोबत कशीही वागली, तरी आईचं काळीज हे नेहमी तिच्यासाठीच धडधडत असतं, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे एका आईने तिच्यावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं आहे.

शेवटी आईच ती! ज्या मुलाने चाकूने सपासप वार केले, त्यालाच तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, कोर्टात म्हणाली...
मुलं कशीही असली, ती तिच्यासोबत कशीही वागली, तरी आईचं काळीज हे नेहमी तिच्यासाठीच धडधडत असतं, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे एका आईने तिच्यावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं आहे. मी माझ्या मुलाला तुरुंगात गेलेलं पाहू शकत नाही, असा जबाब कोर्टात नोंदवल्यानंतर केरळ हायकोर्टाने संवेदनशील भूमिका घेत आईचा जबाब ग्राह्य धरून मुलाला जामीन मंजूर केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना नववर्षाचं स्वागत करत असताना घडली होती. त्यावेळी मुगला सिमेल याने आईकडे पैसे मागितले होते. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर तो चांगलाच संतापला होता. त्याने रागाच्या भरात आईवर सपासप वार केले होते. त्यात आईला १२ गंभीर जखमा झाल्या होत्या. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी सिमेल याला अटक केली होती. तसेच त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सिमेल याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने कोर्टात जामिनासाठी अर्ज दिला होता. मात्र जोपर्यंत आरोपीची आई तिची कुठलीही तक्रार नसल्याचे सांगत नाही, तोपर्यंत जामीन मिळू शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. त्यानंतर आईने कोर्टामध्ये शपथपत्र सादर करत सांगितले की, माझी कुठलीही तक्रार नाही आहे. मी माझ्या मुलाला तुरुंगात पाहू शकत नाही. आईने दिलेल्या या जबाबानंतर कोर्टाने आपल्या भूमिकेत बदल करत सिमेल याला जामीन मंजूर केला.
या प्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी सांगितले की, हे एका दु:खी आईचे अश्रूंनी भरलेले शब्द होते. कदाचित आईने तिला जखमांमधून होत असलेल्या वेदना विसरून मुलाला माफ केलं असावं. आईचं प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखं असतं. परिस्थिती कितीही खडतर असली तरी ते फुलतच राहतं, असेही न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.