तिरुवनंतपुरम : अरब अमिरातीतील वाणिज्य दूतावासाच्या मदतीने केरळमध्ये जे सोने स्मगलिंगने आले, त्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि अन्य तीन मंत्र्यांना होती, असा दावा कस्टम्स विभागाने एका आरोपीच्या जबाबाच्या आधारे शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला.
प्रचार सुरू असतानाच हे सारे समाेर आल्याने राज्यातील डाव्या आघाडीला मोठाच धक्का बसला आहे. हे आरोप पूर्णत: खोटे असून, भाजप व केंद्र सरकार मुद्दाम ऐन निवडणुकीच्या काळात तपास यंत्रणांमार्फत मुख्यमंत्री व राज्य सरकारला बदनाम करीत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. दुसरीकडे विजयन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे, तर इतके गंभीर आरोप झाल्यानंतरही विजयन मुख्यमंत्रीपद सोडत नसल्याची टीका भाजपने केली आहे. विधानसभेच्या निवडणुकाही याच मुद्द्यावर लढवल्या जातील, असे दिसत आहे.
आरोपीला तुरुंगात हवे संरक्षणशिवशंकर सध्या जामिनावर असून, त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती कस्टम्स विभागाने आज न्यायालयात केली. त्यावर शिवशंकर यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. स्वप्ना सुरेश तुरुंगात असून, तिथे आपणास संरक्षण मिळावे, असा अर्ज तिने केला आहे.या खटल्यातील आरोपी स्वप्ना सुरेश या महिलेने दिलेल्या जबाबात यांची नावे घेतली आहेत. स्वप्ना सुरेश हिने मुख्यमंत्री, राज्यातील तीन मंत्री व विधानसभेचे अध्यक्ष यांचा या स्मगलिंगशी संबंध असल्याचे जबाबात म्हटले आहे. या प्रकरणात अनेक बड्यांचा हात होता आणि काही बड्या मंडळींना लाच देण्यात आली, असे आरोपी महिलेने सांगितल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या प्रतिज्ञापत्रात आहे.