केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हळहळला आहे, हादरला आहे. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आपण अजूनही रानटीच आहोत, माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटते, RIP Humanity, मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही, अशा भावना नेटिझन्स फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. नदीच्या मधोमध निश्चल उभ्या असलेल्या हत्तीणीचा फोटो पाहून अस्वस्थ झालेले प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून हत्येचा निषेध नोंदवला आहे. त्याचं हे वाळूशिल्प व्हायरल होतंय.
ओडिशामधील पुरी इथल्या समुद्रकिनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी हत्तीण आणि तिच्या पिल्लाचं वाळूशिल्प साकारलं आहे. त्यातली हत्तीणीच्या डोळ्यातील वेदना काळजाला हात घालते. ''माणुसकी पुन्हा हरली, अयशस्वी ठरली'', अशा आशयाची कॅप्शन त्यांनी या वाळूशिल्पाला दिली आहे.
केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, दोषींना पकडून कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा काही स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. घटना इतकी वेदनादायी आहे की, हा निर्दयीपणा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.
टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी, क्रीडापटूंनी हत्तीणीच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय.
संबंधित बातम्याः
केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय
राहुल गांधींनी कारवाई का केली नाही?; केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूनंतर मेनका गांधी संतापल्या
तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही नाही; बुडणाऱ्या माणसाला पाहून हत्तीच्या पिल्लानं काय केलं? पाहा
गर्भवती हत्तीच्या निधनावर भडकला सुबोध भावे, म्हणतोय माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागलीय