हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:51 AM2024-09-12T08:51:47+5:302024-09-12T08:57:09+5:30
भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे.
केरळच्या वायनाड जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या भीषण भूस्खलनात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा (२४) समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे. बुधवारी श्रुतीला आणखी एक मोठा धक्का बसला. तिचा होणारा नवरा जेन्सन याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.
डॉ. मूपेन मेडिकल कॉलेजचे प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान झालेल्या अनेक दुखापतीमुळे जेन्सनची प्रकृती गंभीर होती आणि रात्री ८.५० वाजता त्याचा मृत्यू झाला. एजन्सीच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि त्याच्या मेंदूला अंतर्गत दुखापत झाली होती.
मंगळवारी जेन्सनचा अपघात झाला, त्याची कार एका खासगी बसला धडकली. कारमध्ये उपस्थित असलेल्या श्रुती आणि जेन्सन यांच्या कुटुंबातील अनेक जण जखमी झाले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही जेन्सनला वाचवता आलं नाही. श्रुतीच्या कुटुंबातील नऊ सदस्य, त्यात तिचे आई-वडील आणि तिची धाकटी बहीण श्रेया यांचा ३० जुलै रोजी मेप्पाडी पंचायतीच्या चुरलमाला आणि मुंडक्काई गावात भूस्खलनात मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर तिचं आयुष्य अचानक बदलून गेलं. कुटुंबातील अनेक सदस्य गमावल्यानंतर, श्रुतीच्या आयुष्यात तिचा होणारा नवरा जेन्सन हाच आधार होता. २ जून रोजी तिचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर ही घटना घडली. २९ ऑगस्ट रोजी श्रुती आणि जेन्सन पुथुमाला स्मशानभूमीत गेले, जिथे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रुती आणि जेन्सन यांनी सुरुवातीला डिसेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचा प्लॅन केला होता. परंतु भूस्खलनानंतर, त्यांनी सप्टेंबरमध्ये कोर्टात साध्या पद्धतीने रजिस्टर्ड लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अशातच आता जेन्सनच्या मृत्यूने श्रुतीला मोठा धक्का बसला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच ही बातमी अतिशय दुःखद आहे असं म्हटलं आहे.